कोकण, महाबळेश्वर सह इतर धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी
अमळनेर (प्रतिनिधी): येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूलची ४ दिवसीय शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली.यावेळी कोकण,महाबळेश्वर सह धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी सहलीचा मनमुराद आनंद घेतला.
१५ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान सहलीचे आयोजन करण्यात आले होते.यात अष्टविनायक गणपतींपैकी महड येथील वरदविनायक, पाली येथील बल्लाळेश्वर गणपती यांचे दर्शन घेतले.यानंतर अलिबाग व मुरुड येथील समुद्रकिनारा,जंजिरा किल्ला यांची विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली सोबतच दिवेआगर येथील सोन्याचा गणपती,बिर्ला मंदिर,हरिहरेश्वर येथील प्राचीन महादेव मंदिर व समुद्रकिनाऱ्याला भेट दिली.श्रीवर्धन येथील समुद्रकिनाऱ्यावर विद्यार्थ्यांनी विविध राईड चा अनुभव घेतला.त्यांनतर महाबळेश्वर येथील नैसर्गिक व ऐतिहासिक ठिकाणांची पाहणी केली नंतर पाचगणी येथील मॅप्रो गार्डन ला भेट दिली.शेवटी वाई येथील पेशवे कालीन महागणपती चे दर्शन घेतले व नंतर अमळनेर कडे प्रस्थान केले.
शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा व शासनाच्या नियमांना अधीन राहून महामंडळाच्या एस.टी.बसने विद्यार्थ्यांनी प्रवास केला.या सहलीत एकूण ७८ विद्यार्थी तर ८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.एकूण २ बसची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणांची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती गोळा केली.संपूर्ण सहलीत विद्यार्थ्यांच्या मुक्कामाची तसेच भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती.
शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी, मुख्याध्यापक बी.एस.पाटील यांच्या परवानगीने सहलीचे नियोजन करण्यात आले होते.सहल विभाग प्रमुख आर.जे.पाटील, आर.एन.साळुंखे यांनी सहलीचे नियोजन केले त्यांच्यासोबत पर्यवेक्षक एस.आर. शिंगाणे,शाम पवार, आर.पी.जैन, एस.आर.पाटील,एन.जे.पाटील व सी.आर.पाटील सहभागी झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या