खेळातील राजमुद्रेच्या सर्टिफिकेट मुळेच पोलीस सेवेत रुजू झालो- पी आय श्री पवन देसले
धरणगाव प्रतिनिधी :-
साळवे तालुका धरणगाव येथील इंग्रजी विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी धरणगाव चे पोलीस निरीक्षक पवन देसले साहेब म्हणाले की आज मी केवळ खेळामुळेच पोलीस भरतीमध्ये खेळाडू म्हणून रुजू झालो. विविध खेळातून मनाला, बुद्धीला व शरीराला फायदा होतो. शरीर तंदुरुस्त राहते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये खेळाचे खूप महत्त्व आहे. खेळामुळे व्यक्तिमत्व विकसित होते. रोज सकाळी योगा, मॉर्निंग वॉक केल्याने दिवसभरातील कामासाठी त्यामुळे ऊर्जा मिळते. नियमित पेपर वाचन, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून व मैदानी खेळांच्या सराव करून यशस्वी झालो.कोणत्याही प्रकारच्या मोबाईलचा, टी व्ही चा छंद न जोपासता स्वतःला अभ्यासात मग्न ठेवा असे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी चपळ, होतकरू, लवचिक व हुशार असतात. मराठी व सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांमध्ये चांगली वर्णी लागते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश नारखेडे, प्रमुख अतिथी खजिनदार डॉक्टर चंद्रकांत नारखेडे, पोलीस हवालदार श्री पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस डी मोरे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सवाचे, खेळाचे व व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. क्रीडाशिक्षक बी आर बोरोले, ए वाय शिंगणे, ज्येष्ठ शिक्षिका नीता पाटील, प्रतिभा पाटील, पौर्णिमा वारके, वर्षा नेहेते, गुणवंती पाटील, ज्येष्ठ शिक्षक जी व्ही नारखेडे, एस व्ही राठोड आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वेगवेगळे सर्व धर्मीय पोशाख घालून उत्कृष्ट असे संचलन केले. उत्कृष्ट संघ निवडल्यानंतर त्यांना बक्षीस देण्यात आले. यावेळी उल्हास नवभारत साक्षरता अभियानात उत्कृष्ट गीत गायन व पोवाडा गायन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या रोशनी गोपीचंद पाटील, दहावीच्या विद्यार्थिनीला ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वकृत्व स्पर्धेत तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या सना निसार पटेल, दहावी या विद्यार्थिनीला सुद्धा ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आणि साळवे केंद्राला उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य निर्मितीचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाल्यामुळे शिक्षकांचा स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व्ही एस कायंदे यांनी केले. पाहुण्यांच्या परिचय व्ही के मोरे यांनी करून दिला. आभार प्रदर्शन सौ रंजना नेहेते यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या