अमळनेर: “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही अभिमानाची बाब असून साहित्य व संस्कृती यातील अभिमानास्पद परंपरेबरोबरच मराठी भाषेत रोजगाराच्या मौलिक संधी देखील उपलब्ध आहेत” असे प्रतिपादन झेड. बी. पाटील महाविद्यालय धुळे येथील मराठी विभाग प्रमुख योगिता पाटील यांनी केले. भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य व धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत सभागृहात आयोजित मार्गदर्शन सत्रात त्या बोलत होत्या. याप्रसंगी धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी डी पाटील हे अध्यक्षस्थानी होते तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील, प्रा. अशोक पवार, डॉ. ज्ञानेशवर कांबळे व महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून डॉ संजय पवार व भरत जाधव हे उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनातर्फे मराठी भाषा पंधरवाडा संपूर्ण राज्यभर साजरा होत असून या निमित्ताने ‘३६ जिल्हे ३६ मार्गदर्शन सत्रे’ हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यात जळगाव जिल्ह्यातून अमळनेर येथील धनदाई महाविद्यालयाची निवड करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य लिलाधर पाटील यांनी मराठी ही मातृभाषा असून आपले स्पष्ट आकलन मातृभाषेतूनच शक्य होते यामुळेच नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला असल्याने या निमित्ताने अनेक नवीन संधी उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन केले.शासनाचे प्रतिनिधी डॉ. संजय पवार यांनी सरकारी क्षेत्रात मराठी भाषिकांसाठी उपलब्ध संधी समजावून सांगितल्या.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. योगिता पाटील यांनी मराठी भाषेचे सखोल ज्ञान, सादरीकरण कौशल्य व परिश्रम करण्याची तयारी असणाऱ्यांना समाज माध्यमे ते आकाशवाणी, ब्लॉग लिखाण ते मुद्रित संशोधन असे अनेक पर्याय सोदाहरण समजावून सांगितले. मराठी भाषेच्या संवर्धन व वृद्धीसाठी असे कार्यक्रम पालक व ग्रामीण वर्गासाठी देखील व्हावेत अशी आशा वक्त करून प्रत्येक जिल्ह्यास स्वतंत्र मराठी भाषा अधिकारी असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, प्रताप महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, डॉ रमेश माने, प्रा. योगेश पाटील, प्रा. विलास गावित, धनदाई महाविद्यालयाचे उपप्राचार्य राहुल इंगळे, डॉ. किशोर पाटील, डॉ. जयवंतराव पाटील, डॉ. प्रवीण पवार, डॉ. रमेश पावरा, डॉ. भगवान भालेराव, डॉ. संगीता चंद्राकर, प्रा. मीनाक्षी इंगोले, प्रा. मेघना भावसार, प्रा. भाविका पाटील, प्रा. अतुल सैंदाणे, प्रा. रवींद्र चौधरी, प्रा. डॉ. शैलेश पाटील, यासह विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ प्रशांत पाटील यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र पाटील, दगडू पाटील, विनोद केदार, कैलास अहिरे आदींनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या