आपल्या देशात कृषी संस्कृतीवर आधारित सन व उत्सव यांची परंपरा दिसून येते. मुख्य व्यवसाय कृषी म्हणजे शेती असल्याने बहुतेक सर्व सण, उत्सव हे कृषी संस्कृतीशी निगडित आहेत. महाराष्ट्रातील खानदेश मध्ये कानबाई ह्या सण साजरा करण्याची परंपरा दिसून येते. विज्ञानाच्या अभ्यासाचे सुरुवात वैचारिक अंगाने होण्याच्या अगोदर काही पंचमहाभूते याला शरण जाऊन अथवा मिथके वापरून सण निर्माण झालेत. विज्ञान हे कार्यकारण भाव तपासत असते. विज्ञानाची सुरुवातच प्रत्यक्ष कार्यकारण भाव दिसल्यावर होते. पूर्वीच्या काळी ज्या नैसर्गिक घटना घडत होत्या त्या घटना कोणीतरी महान शक्ती या घटना घडवून आणत आहे अशी धारणा त्या काळात रूढ झाली होती. यामध्येच देवाचा देव महादेव ह्या देवाला सर्व शक्तिमान मानले जात होते. मातृसत्ताक पद्धतीला त्या काळात महत्व होते. महादेव शिव व मातृसत्तेचे प्रतीक म्हणून पार्वतीला मानले जाई. शक्ती ही सर्वत्र असते या धारणेने पार्वतीचे अनेक रूप मानली गेली. शिव म्हणजे सर्वसामान्यांचा देव जो सहज प्रसन्न होतो. कृषी संस्कृतीचे प्रतीक म्हणून शिवाला महत्त्व होते. अशा शिवाच्या शक्तीला म्हणजे पार्वतीला अनेक रूपात पाहण्यात आले.
खानदेशात म्हणजे पूर्वीच्या कानदेशात मातृ सत्ताक देवतेला मानण्याची परंपरा होती. या परंपरेतून पार्वती मातेला कानबाई संबोधले गेले. कानबाई म्हणजे खानदेशातील देवता होय. कोणतेही चांगले काम करण्या अगोदर अशा आराध्य देवतेला पूजनाची परंपरा कृषी संस्कृतीत होती. कृषी संस्कृती बी जमिनीत पेरण्या अगोदर आपल्या कुलदेवतेचे स्मरण केले जाईल. कानबाई ही खानदेशातील शक्तीचे प्रतीक मानले जाई. कानबाईच्या प्रेरणेने आपली शेती फलदायी होईल ही आशा ठेवून त्या देवतेवर विश्वास ठेवला जाई. शेतीमध्ये पीक आल्यावर कानबाईला त्याचा नैवेद्य दिला जाई. सर्व उत्सव हे निसर्ग व समाजाला उन्नत करणारे होते. प्रत्येक सण, उत्सवा मागे समाजाला एकत्रित आणण्याचा अप्रतिम प्रयत्न होता. कानबाई उत्सवाच्या निमित्ताने सर्व भाऊबंदकी ला एकत्र आणण्याची परंपरा त्यानिमित्ताने भाऊबंदकी मधील विविध वाद मिठात असत. एकमेकांमधील द्वेष ,राग, इर्षा कमी होऊन भाऊकी एकत्रित येत असे. भाऊकी एकत्रित करणारा उत्सव म्हणजे कानबाई उत्सव होय. आपल्याला शेती करण्याची शक्ती देणारी देवता म्हणून कानबाईला पूजले जात होते. आपल्या मागे कानबाई सारखी शक्ती आहे. त्यामुळे आपण केलेली मेहनत वाया जाणार नाही हा भाव कानबाईच्या उत्सवा मागे दिसून येतो. कालांतराने श्रीकृष्ण हा बहुजनाचा देव मानला जाऊ लागला. श्रीकृष्णाच्या काही कृती बहुजनाच्या वृत्तीला बळ देणाऱ्या होत्या. इंद्रा सारख्या गर्विष्ठ देवतेला बहुजनाच्या सहकार्याने त्याला झालेला गर्व हरण करण्याचे उदाहरण म्हणजे बहुजनांना एक प्रेरणा देण्यासारखे होते. श्रीकृष्ण व रुक्मिणी तसेच राधा ह्या सुद्धा बहुजनांची श्रद्धा असलेली देवते होती. ह्या श्रद्धेपोटी राधा व रुक्मिणी यांना रानबाई म्हणून पूजले जाऊ लागले. कानबाई व रानबाई यांना शक्तीची दैवते मानले जाऊ लागले. या उत्सवामध्ये गावागावात भाऊकी एकत्रित येऊन कानबाई ह्या देवतेचे पूजन करीत असत.. जुन्या काळामध्ये ज्वारी, बाजरी याचा वापर जास्त प्रमाणात केला जात असे. गहू पासून बनलेले पदार्थ सण व उत्सव यावेळीच वापरले जात असत. त्यामुळे भाऊकी एकत्र आली की गोडधोड केले जात असे. गहू हे धान्य श्रीमंतांचे धान्य मानले जात असे. धान्याचा वापर सणासुदाला केला जात होता. त्यामुळे रोट म्हणून त्याचा वापर केला जाई. कानबाई हा उत्सव तीन दिवसाचा असतो. पहिल्या दिवशी साधे रोट व रानभाजी केली दुसऱ्या दिवशी खीर व पुरणपोळी बनवली जाते. पूर्वीच्या काळी रोट हाच प्रकार वापरला जात होता. पुढे त्याचा पुरणपोळी करून वापर होऊ लागला. पुरणपोळी व आमटी याचा मेनू बनवू लागले. पूर्वी सणासुदीला गोड पदार्थ करीत असत. इतर दिवसांना भाजी भाकरी, चटणी मिरची खात असत. कानबाई या देवतेने आपल्या ऐकून चांगल्या प्रकारचे पिक शेतीमध्ये उगवून आपली इच्छा पूर्ण केली म्हणून त्या देवतेला एका टोपलीमध्ये काही बियाणे उगवून देवीला पूजनासाठी मंदिरात अथवा देव्हाऱ्यात घेऊन जात ती परंपरा वाजत गाजत कानबाई गीते गात साजरी करत. देवीच्या मंदिरात सर्व भाऊकी नैवेद्य दाखवून जेवणाला बसत. रात्रीच्या वेळी कानबाई चे संगीतमय गीते म्हणून नाचत आनंद साजरा करीत असत. मातृ शक्तीला मानण्याची ही जुनी परंपरा आहे. विज्ञानाची चांगल्या पद्धतीची रुजवन झाल्यामुळे आज जरी मानव प्रगत झाला असला तरी भाऊकी एकत्रित आणण्याची उत्तम परंपरा कानबाईच्या नावाने सुरू आहे. आज जागतिकीकरणाच्या युगात माणूस एकमेकांपासून पारखा झालेला आहे. त्याचे दुष्परिणाम त्याला दिसून येत आहे. भाऊकीत एकत्रितपणा दिसून येत नाही. सर्वात जास्त इर्षा, राग, द्वेष भाऊकीच्या नात्यांमध्ये वाढलेला आहे. भाऊकीच्या सर्वात जास्त केसेस न्यायालयात चालू आहेत. आपला भाऊ हा होता कामा नये. यासाठी त्याला कानबाईच्या उत्सवाच्या निमित्ताने एकत्रित करून राग, द्वेष नष्ट करून आपसात जिव्हाळा, आपुलकी, प्रेम निर्माण करण्याचे प्रतीक म्हणजे कानबाई उत्सव होय. आज नात्या नात्यांमध्ये प्रेम कमी होत असताना अशा परंपरेची गरज आहे. आपला नातेवाईक हा एकत्रित आल्यास जीवनात वेगळा आनंद निर्माण होतो. अनेक भाऊकी एकत्रित असल्याने त्यांनी आपला विकास चांगल्या पद्धतीने केलेला दिसून येतो . राजकीय, सामाजिक ,आर्थिक दृष्टीने समाजाची प्रगती होते. भाऊकी एकत्रित असली की समाज एकत्रित होतो. अशा या सुंदर परंपरेत कानबाई आपल्या एकतेचे प्रतीक आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या