अखिल भारतीय नाट्य परिषद अंतर्गत बालकांसाठी काम करणाऱ्या रंगकर्मींसाठी, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के-सावंत आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीने अधिक सकस, सक्षम तथा स्वयंपूर्ण बालनाट्य सादर होण्याकरिता बालनाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्रभरातील लेखक, दिग्दर्शक, रंगभूषाकार, वेशभूषाकार, संगीतकार आणि नेपथ्यकार या साऱ्यांना एकत्र करून नवी मुंबईत, दिनांक १९ व २० एप्रिल रोजी या कार्यशाळेचे आयोजन केले.
प्रथम सत्रात, संजय हळदीकर (कोल्हापूर) या नाट्य शिबिरांच्या अनेक वर्षांच्या अनुभवी व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट सर्व उपस्थितांनी आपल्या कामासोबत जोडून घेतला. त्यांनी वंचित मुलांसाठीची नाट्य शिबिरे – अनाथालय, वेश्यालये, आश्रमशाळांतील मुलांमध्ये जाऊन – विविध शिबिरांचे आयोजन का आवश्यक आहे, हे सांगतानाच शालेय रंगभूमीची आवश्यकता अधोरेखित केली.
या संवादात, नाट्य निर्मितीमध्ये विषय निवड, मांडणी तसेच मोठ्या अभिनेत्यांनी बालप्रेक्षकांसाठी छोट्या मुलांची पात्रे करणे ही आवश्यक गोष्ट आहे. स्थानिक बोली भाषेचा वापर बालनाट्यात सर्रास करायला हरकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
पन्नास वर्षे या क्षेत्रात सेवा देणारे, बालनाट्य शिबिराचे तपस्वी प्रकाश पारखी सर यांनी देखील आपल्या नकला, गंमत गाणी, खेळगाणी यांचा वापर नाट्य शिबिर व सादरीकरणात करावयाचे आवाहन केले. सर्वच शिबिरार्थी काही अभिनेते होऊ शकत नाहीत; याकरिता इतर मार्ग खुले आहेत – जसे कथाकथन, एकपात्री नाटक, स्वगत आणि नाट्यछटा – या माध्यमातूनही आपल्याला बालकांची सेवा करता येते.
पुढील सत्रात, पुणे येथील सुदर्शन रंगमंचाच्या निर्माती शुभांगी दामले यांनी भारतीय नाट्यपरंपरेसोबतच ग्रीप्स रंगभूमीच्या माध्यमातून प्रायोगिक रंगमंचाची निर्मिती करून महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या योगदानाने त्या सतत बालनाट्य क्षेत्रात काम करीत आहेत. उपस्थितांना त्यांनी आवाहन केले की, बालकांचे निखळ मनोरंजन आणि सादरीकरणाच्या नवकल्पनांमधून बालनाट्य रंगभूमी अधिक बलवान होईल.
समारोपात, बालरंगभूमीचे उपाध्यक्ष श्री. राजीव तुलालवार यांनी सध्या सर्वदूर गैरमार्गाने पालकांची आर्थिक लूट करणाऱ्या शिबिरांची रेलचेल सुरू असल्यावर प्रकाशझोत टाकला. त्यांनी स्पष्ट केले की, बाल अभिनय शिबिर वेगळे व बालनाट्य शिबिर वेगळे असून या दोन्ही शिबिरांचा अभ्यासक्रम वेगवेगळ्या स्वरूपात आखूनच अशी शिबिरे आयोजित करावी लागतील.
नाटक पोहोचवण्यासाठी अभिनेत्याची वेशभूषा हा महत्त्वाचा टप्पा आहे. या सत्रात, मराठी सिनेमा, नाटक, मालिका यात अनेक वर्षे सेवा देणाऱ्या, तसेच अनेक पुरस्कारांच्या मानकरी पौर्णिमा ताई ओक यांनी कमीत कमी खर्चात बालनाट्यातील दृश्य उठावदार करण्यासाठी प्राणी, पक्षी, राक्षस, राजपुत्र, राजा यांच्या कपड्यांना अधिक खुलविण्यासाठी विविध युक्त्यांचा वापर करून बालनाट्य कमीत कमी खर्चात सादर होऊ शकते, हे स्वअनुभवातून सांगितले. यात रंगसंगती व स्वभावानुसार कपड्यांची आखणी यामुळे अनेक गोष्टी सहज साध्य होतात, अशा विचाराने सत्र समाप्त झाले.
नाटक रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी रंगमंचावर प्रकाशयोजना महत्त्वाचे काम करते. प्रकाश योजनेचा इतिहास ३५०० वर्षांपासूनचा आहे. प्रकाश योजनेचे गमक सांगताना शितल तळपदे यांनी, रंगमंच ज्या प्रकारचा असेल त्या पद्धतीने प्रकाशयोजना करणे आवश्यक आहे, असे सांगितले. अगदी पुरातन काळात मशाल, गॅस लाईट, बल्ब यापासून ते आजच्या फुटलाईट, डिमर, एलईडी पर्यंतचा प्रवास उलगडून दाखवला. त्यांनी प्रकाशयोजना केलेल्या अनेक नाटकांवर व सिनेमांवर उपस्थितांशी चर्चा करताना प्रकाशझोत टाकला. विशेषतः *तुंबारा*, *विठ्ठल तो आला आला हं तू तर*, *चाफेकळी*, *हाच खेळ उद्या पुन्हा*, *फुलांना सुगंध मातीचा*, *विषवृक्षाची छाया* या नाटकांतील प्रकाश योजनेचे अनुभव सांगून उपस्थितांच्या माहितीत भर घातली. शितल तळपदे यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित भारावून गेले.
नाटकातील अभिनयाला व पात्रांना पूरक असे पार्श्वसंगीत, ध्वनिमुद्रण व संकलन नंदलाल रेळे व महेश मांजरेकर यांच्या ध्वनी संकलनाने उपस्थितांचे कान तृप्त झाले. त्यांच्या जीवनप्रवासातील एक विक्रम लक्षात आणून दिला – एकदा त्यांनी ३६५ दिवसांत ३९५ नाटकांना पार्श्वसंगीत दिले होते. हे ध्वनिमुद्रण, ध्वनी संकलन, पार्श्वसंगीत यासाठी केलेली साधना आणि मिळालेला प्रतिसाद याची सांगड घालताना त्यांनी जो प्रयत्न केला, तो रंगकर्मींना प्रेरणादायी ठरला.
कलावंतांच्या नाट्यप्रवासाची सुरुवात जी होते ती गालाला रंग लावून – अर्थात, रंगभूषा – या महत्त्वपूर्ण घटकाची माहिती या कार्यशाळेत केदार ओटवणेकर यांनी दिली. त्यांनी उपस्थित बालकांच्या चेहऱ्यावर विविध प्रकारचे रंग लावून पात्र निर्मिती केली. रंगभूषा करताना नाटकाची संहिता, मंचावरील नेपथ्य, प्रकाशयोजनाकाराचे मागणी यानुसार रंगभूषा करणे आवश्यक असते. रंगभूषाकार हा फक्त चित्रकला, शिल्पकला, लेखन, अभिनय यासोबत निरीक्षण शक्तीही दांडगी असावी, असा संदेश त्यांनी दिला. बालकथांच्या मागणीनुसार पूरक मेकअप करून रंग भरले.
समारोपाच्या सत्रात, नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाने दृश्याची रचना व्हावी यासाठी रंगमंचाची पाहणी करणे आवश्यक आहे, तसेच दिग्दर्शकाची मागणी, प्रसंगाची आवश्यकता, उपलब्ध साधने या माध्यमातूनच चारही प्रकारच्या नाट्यगृहांमध्ये वेगवेगळे नेपथ्य करावे लागते, असे त्यांनी समजावले.
महाराष्ट्रभरातून आलेल्या रंगकर्मींनी बालरंगभूमीच्या संचालक मंडळाला तसेच नवी मुंबई शाखेला धन्यवाद दिला आणि “आम्ही अधिक दर्जेदार बालनाट्य सादर करण्यासाठी आता तयार आहोत,” असे आश्वासन देत या कार्यशाळेची सांगता झाली.
या कार्यशाळेसाठी शैलेश गोजमगुंडे, दीपाली शेळके, सतीश लोटके, वैदेही चौरे, योगेश शुक्ल, नागसेन वडस्कर, दीपक क्षीरसागर, अनंत जोशी यासह नवी मुंबई शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
आपला,
संदीप घोरपडे (रंगकर्मी, अमळनेर)
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या