७५ जोडप्यांच्या हस्ते सामाजिक सद्भाव गायत्री महायज्ञ
अमळनेर: येथील प्रताप महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक व सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात एक समर्पित व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित असलेले प्रा.धर्मसिंह धनसिंह पाटील (प्रा.डी.डी.पाटील सर) यांनी नुकतीच आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमीत्ताने त्यांचा सत्कार समारोह व सामाजिक सद्भाव गायत्री महायज्ञाचे आयोजन अमृत महोत्सवी सत्कार समारोह समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी बन्सीलाल पॅलेस, अमळनेर येथे करण्यात आले आहे.
प्रा.पाटील सरांनी केलेल्या कार्याचा उचित सन्मान व्हावा यासाठी त्यांचे आप्तस्वकीय, मित्र परिवार यांच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे.
दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत विविध ७५ समाजातील यजमानांच्या हस्ते सामाजिक सद् भाव गायत्री महायज्ञ करण्यात येणार आहे. तर सकाळी १० : ३० वाजता जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध वक्ते प्रा.प्रकाश पाठक (धुळे) तर प्रमुख अतिथी म्हणून सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री श्री संजय पाचपोर यांची उपस्थिती रहाणार आहे. या कार्यक्रमास प्रा.डी.डी.पाटील सरांचे विद्यार्थी, सामाजिक, शैक्षणिक कार्यातील सहकारी, आप्तस्वकीय या सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन सत्कार समारोह समितीच्या वतीने अध्यक्ष बजरंग अग्रवाल,सचिव प्राचार्य डॉ.एस.आर.चौधरी व समिती सदस्यांनी केले आहे.
प्रा.धर्मसिंह पाटील - परिचय
सुमारे ३२ वर्ष अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयात तत्वज्ञान, मानसशास्त्र विषयांचे उत्तम अध्यापन. त्याच प्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक संघटना व संस्थांमध्ये आपला मौलिक वेळ देवून कामांची उभारणी केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अध्यक्ष,विश्व हिंदू परिषद राम जन्मभूमी आंदोलन, रा.स्व.संघ तालुका संघचालक,गायत्री परिवार,पतंजली योग पीठ, लोकमान्य शिक्षण मंडळ,टिळक स्मारक समिती, महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र,प्रताप तत्वज्ञान केंद्र, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल आदि संस्थांमध्ये सरांचे योगदान महत्वपूर्ण आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या