अमळनेर: अशी पाखरे येती अन् स्मृती ठेऊनी जाती, अशीच आमच्या जि प प्राथ शाळा जवखेडे येथील चौथी ची चिमणी पाखरे लवकरच शैक्षणिक वर्ष संपताच पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेत प्रवेशीत होतील. या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम शाळेत घेण्यात आला. एका बाजूला नवीन शाळेत जाणार असल्याचा आनंद व दुसऱ्या बाजूला चांगली शाळा , शिक्षक यांच्या पासून दूर जाण्याचे दुःख अशा मनःस्थितीत असलेले आमचे विद्यार्थी कार्यक्रमात वावरत होते. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक नानासो श्री छगन पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपली शाळा, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, मित्र सर्वांविषयीच प्रेम व्यक्त करत आनंददायी आठवणी सांगत, ज्ञानाची व संस्कारांची शिदोरी सोबत नेणार असल्याचे सांगितले. अतिशय भावनिक झालेले विद्यार्थी भरभरून बोलले.त्यानंतर इयत्ता चौथीच्या वर्गशिक्षक श्री मुकेश पाटील यांनी त्यांच्या वर्गातील प्रथम प्रवेशा वेळेचे किस्से सांगितले. व त्यानंतर मुलां मध्ये झालेला बदल, समजदारपणा, नम्रपणा याचे कौतुक केले. मुख्याध्यापक श्री छगन पाटील यांनी चौथीचे वर्गशिक्षक व विदयार्थी यांचे खूप कौतुक केले. अतिशय गुणी असलेले हे विद्यार्थी हा ज्ञानाचा ठेवा घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करतील अशी आशा व्यक्त केली. प्राथमिक शिक्षण देणारे शिक्षक व त्यांनी दिलेले ज्ञान हे चिरकाल टिकते असे सांगत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी चौथीच्या विद्यार्थ्याकडून शाळेला शिवराज्याभिषेक सोहळा ची प्रतिमा भेट देण्यात आली.
यानंतर मुख्याध्यापक श्री छगन पाटील यांचा चिरंजीव चि ज्ञानेश छगन पाटील याचा वाढदिवस साजरा करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या. तदनंतर वरणभात, बट्टी, वांग्याची भाजी, जिलेबी अशा रुचकर जेवणाचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री छगन पाटील यांनी, सुत्रसंचालन उपशिक्षिका सौ सुनिता पाटील यांनी तर आभार प्रदर्शन श्रीम अर्चना बागुल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री छगन पाटील, उपशिक्षक श्रीम रेखा पाटील, सौ सुनिता पाटील, श्रीम अर्चना बागुल, श्री मुकेश पाटील, श्री माधवराव ठाकरे, युवा प्रशिक्षणार्थी श्रीम अनिता बोरसे यांनी परिश्रम घेतले. अशाप्रकारे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या